Shivsena : ‘सरनाईकांना आता लॉण्ड्रीमध्ये टाकून, धुवून चकाचक करण्याचा प्रयत्न सुरू आहे’- उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

शिवसेनेसोबत बंड करून शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणामध्ये कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. यावर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेत बंड करुन शिंदे गटात गेलेले बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची केस मागे घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला आहे. त्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी माणसाने मुंबई मिळवली. पण बेळगाव, कारवार, निपाणीचा भाग तसाच राहिला आहे. गेली काही वर्षे ही केस सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. पण पक्षांतर केल्याने आता प्रताप सरनाईकवरील केस तातडीने मागे घेतली जात आहे.

सरनाईक आता भाजपसोबत गेल्याने त्यांना लॉण्ड्रीमध्ये टाकून, धुऊन चकाचक करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळेत कपडे धुऊन दिले पाहिजेत म्हणून की, ही केस लोकशाहीपेक्षा मोठी आहे म्हणून मागे घ्यायची घाई सरकार करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, सरनाईक यांच्यासंबंधित न्यायालयाने सी समरी अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हा रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून सरनाईक यांची सुटका होणार आहे.

सरनाईक यांची ईडी चौकशी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरनाईकांविरोधात गेली काही महिने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मात्र याप्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. ‘मला यावर काहीही बोलायचे नाही’ असे त्यांनी म्हंटले आहे.