Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि शिंदे गटातील पेचावर सुनावणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी जबरदस्त युक्तिवाद केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मातोश्रीवर उस्मानाबादहून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर शिंदे गट आणि भाजपवर खरमरी टीका केली.
शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना मातोश्रीवर घेऊन जात त्यांच्या हाती शिवबंधन बांधले. त्यावेळी उपस्थितांसमोर उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘आई भवानीवर मला विश्वास आहे. विजय आपलाच होईल.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आई भवानीचा आशीर्वाद असल्यानंतर कितीही अफजल खानसमोर आले तरी मला पर्वा नाही. विजय आपलाच होईल. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झाली आहे. लवकरच मी दुर्गा भवानीच्या दर्शनाला येणार आहे,’ असेही यावेळी ते कार्यकर्त्यांना म्हणाले.
‘आपल्याला न्याय मिळणार, मिळालाच पाहिजे. न्याय देवतेवर आणि आई तुळजाभवानीवर माझा विश्वास आहे. विजय आपलाच होईल. आपले कोठेही काही वाकडे झाले नाही. खरे- खोटे काय, हे आई भवानीने आपल्याला दाखवून दिले आहे. न्यायालयीन लढाई आपणच जिंकू,’ असा विश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, ‘धाराशिवचे मला फार कौतुक आहे. कैलासने काय पराक्रम केला? हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच. मात्र जालन्यातील परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. “ज्यांना खस्ता खाऊन तुम्ही मोठे केले. ते खोक्यात गेले,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता अर्जुन खोतकर यांना जब्बर टोला लगावला.
अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्यांवर तोफ डागली. तसेच ठाकरेंनी न्यायदेवतेवर विश्वास व्यक्त केला. विजय आपलाच होईल, असे म्हणत शिवसैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून यावेळी होताना दिसतो आहे.