uddhav thackeray : अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंबई हायकोर्टाने मुंबई महानगर पालिकेला अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या आधीच ठाकरे गटाने एक लढाई जिंकली असल्याच बोललं जातं आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे आहे.
उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाल्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होत आहे. अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट एकेमकांच्या पुढे उभे राहिले आहेत. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत.
अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचिवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीति आखली असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आणि दिवाळी सोबतच आल्याने ठाकरे गट दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रचार करणार असल्याचं बोललं जातं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दिवाळीची आयती संधी साधत कंदील, सुगंधी उटणे, भेटवस्तू आणि शुभेच्छा यांच्या माध्यमातून मशाल चिन्हाचा प्रसार करायला सुरुवात केली आहे. घरोघरी जाणाऱ्या सुगंधी उटण्यांच्या पाकिटावरही मशाल हे चिन्ह छापण्यात आले असल्याचं माजी मंत्र्यांनी सांगितलं आहे.
तसेच उद्यापासूनच म्हणजेच शनिवार, रविवारपासूनच घरोघरी सुगंधी उटण्यां पाची पाकीट वाटायला सुरुवात होणार असल्याचे शिवसेनेच्या एका माजी मंत्र्याने सांगितले आहे. याचबरोबर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शिवसैनिकांना आपापल्या विभागामध्ये आत्तापासून मशाल चिन्हाचा प्रसार करावा, अशा सूचनाच देण्यात आल्या आहेत.