Share

Uddhav Thackeray On Raj Thackeray: संजय राऊत म्हणाले, शेजारील ‘शिवतीर्थ’ही आमचं आहे; उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray On Raj Thackeray: मुंबईतील शिवतीर्थ (Shivtirth Mumbai) येथे यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबतच्या युतीवर भाष्य करत एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर भाजपवर (BJP) हिंदुत्वाच्या मुद्यावरून कडवी टीका करत झेंड्यातील हिरवा रंग काढण्याची जोरदार मागणी केली.

संजय राऊतांचा इशारा 

मेळाव्यात भाषण करताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेजारी असलेलं शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरे यांचे निवासस्थान देखील आपलंच असल्याचं म्हटलं. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनीही मनसेसोबतच्या युतीवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. “आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. मराठीसाठी कायमसोबत उभे राहणार,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर शिवसैनिकांनी जल्लोष करत प्रतिसाद दिला.

राज-उद्धव एकत्र येण्यावरून शिंदेंचा टोला

राज आणि उद्धव यांच्या जवळिकीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. “कोण कुणाशी मनोमिलन करतं याची चिंता करण्याची गरज नाही. सर्वांचा हिशोब आमच्याकडे आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपवर उद्धव ठाकरेंचा प्रहार

भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट घणाघाती हल्ला चढवला. “एका बाजूला मुस्लिमांना देशद्रोही म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) मुस्लिम मौलवींशी भेट घेतात. ही दुहेरी नीती आम्ही सहन करणार नाही,” असं ते म्हणाले. त्यांनी भाजपला टोला लगावत सांगितलं की, “आधी आपल्या झेंड्यातील हिरवा रंग काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now