राज्यात सध्या भोंग्यांच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी औरंगाबादमध्ये, ठाण्यात आणि गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं.
त्यानंतर थेट राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकीदेण्यात आली असल्याची माहिती समोर आली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, असं मनसे नेत्यांनी म्हंटलं.
तर आता ठाकरे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. तर आता राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून, फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केल्याची माहिती मिळत आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंना धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याच बोललं जातं आहे.
तर जाणून घ्या सविस्तर पत्रात काय म्हंटलं आहे…? काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचं एक पत्र माझ्या लालबागच्या पक्ष कार्यालयात आलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
धक्कादायक बाब म्हणजे धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा गर्भित इशारा दिला होता.