Share

Uddhav thackeray : कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना धोका नाही; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितला वेगळा अँगल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकांवर काय निकाल असेल याबद्दल वेळोवेळी भविष्यवाणी करणारे कायद्याचे अभ्यासक उल्हास बापट यांनी आजच्या कोर्टाच्या निकालाबाबत देखील आपलं मत मांडलं आहे.

शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टाने पूर्ण केली आहे. शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय आज सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबतचा निर्णय घेण्यापासून रोखावं, अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र कोर्टाने ही मागणी मान्य न केल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, असे बोलले जात आहे.

मात्र कोर्टाच्या या निकालाबाबत कायद्याचे अभ्यासक उल्हास बापट यांनी आणखी एकदा भविष्यवाणी केली आहे. बापट यांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे. त्यांनी कोर्टाच्या या निकालाबाबत वेगळ्या अँगलने विचार करत आपलं मत मांडलं आहे.

बापट म्हणाले, ‘एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणूक आयोगाने काहीही निर्णय दिला तरी पुन्हा त्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाता येतं. त्यामुळे आजच्या निर्णयाने सगळं काही संपलंय, असंही नाही. हा खटला आजच्या निर्णयाने फक्त एक-दोन इंच पुढे गेला आहे.’

आजचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे का? यावर उत्तर देताना बापट म्हणाले, काहीही धक्का बसलेला नाही. एकतर निवडणूक आयोगाकडून असं लगेच चिन्ह मिळत नाही. शिवसेनेनी अजून त्यांची कागदपत्रेही सादर केलेली नाहीत. त्यालाही मुदत मागितलेली आहे. या सगळ्याला दोन-चार आठवड्यांचा कालावधीही लागू शकतो .

तसेच म्हणाले, शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील एका पक्षाचं चिन्ह कोणाला मिळतं, हा माझ्या मते फार मोठा प्रश्न नाही. मात्र आमदारांच्या अपात्रतेचा जो मुद्दा आहे तो देशातील लोकशाहीच्या दृष्टीकोनातून खरा कळीचा मुद्दा आहे. कारण देशभरात सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांचं प्रमाण वाढलं आहे.

‘या पार्श्वभूमीवर आमदारांच्या अपात्रतेचं काय होणार? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात राज्यपालांनी काही घटनाबाह्य काम केलं की नाही? असे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, त्याबाबत कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाही. आज फक्त एकच निर्णय झालेला आहे,’ असे बापट म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now