काल मुंबईत शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. त्यांच्या भाषणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाची चिरफाड करण्यासाठी आज नारायण राणे यांनी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच आक्रमक झाले होते. राणे म्हणाले, नैराश्यातून उद्धव ठाकरे यांनी काल भाषण केलं. उद्धव ठाकरे यांचं शिवसेना वाढीसाठी योगदान काय? निष्ठावंतांच्या रक्तावर शिवसेना वाढली, असे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे केवळ आयत्या बिळावर नागोबा आहेत. उद्धव ठाकरेंनी किती मराठी माणसांना घरं दिली, नोकऱ्या दिल्या? उद्धव ठाकरेंनी जास्त बोलू नये. असेही राणे म्हणाले. ‘संजय राऊत यांच्यासारखं उद्धव ठाकरेही जेलमध्ये जातील. आमचा कोथळा काढण्याची भाषा करताय, आमच्याकडे बघितले तरी आम्ही डोळे काढू’ अशी धमकी त्यांनी यावेळी ठाकरेंना दिली.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका केली. म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावरचा नागोबा आहे. एक नंबरचा लबाड लांडगा, सगळं काही स्वार्थासाठी करतो. त्याचं शिवसेना पक्षवाढीसाठी योगदान काय? फक्त भाषणं करुन टोमणे मारायचे, एवढंच त्याचं काम आहे.
तसेच म्हणाले, उद्धव ठाकरेंचं कुटुंब संपलंच आहे, त्यांना संपविण्याची कुणाला गरज नाही. संपलेल्यांना काय संपवणार? प्रत्येक भाषणात मर्द शब्दाचा उल्लेख..अरे किती वेळा मर्द आहे सांगतो, तुला तपासावं लागेल, आयुष्यात मर्दासारखं एक काम केलं नाही. सगळी कामं दुसऱ्यांकडून करून घेतली.
दरम्यान, भाषणात उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांना, ‘मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, ‘असे आव्हान केले होते. यावर राणे यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली. म्हणाले, ‘तुझा अभ्यास वगैरे काही आहे की नाही? हे सगळे निर्णय एखादा पक्ष घेत नाही, असे निर्णय संबंधित परिस्थिती पाहून निवडणूक आयोग घेतो. ढ विद्यार्थी कुठला..’आता राणे यांच्या प्रतिक्रियेवर शिवसेना काय उत्तर देणार पाहावं लागेल.