एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांनी बंडखोरी करत भाजप सोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र, बंडखोरी करूनही उद्धव ठाकरेंशी असलेलं नातं कायम ठेवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केल्याचे अनेक घटनांवरून समोर येत आहे.
भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची भीती शिवसेनेतील बंडखोर गटाला होती. पण उद्धव ठाकरे सत्तेत नसतील तर त्यांना काही त्रास होणार नाही यासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपकडून वचन घेतल्याची माहिती मिळत आहे.
माहितीनुसार, सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना काही अडचण येणार नाही याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत बोलणी केली आहे. उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जाणार नाही, असे आश्वासन देखील भाजपने एकनाथ शिंदे गटाला दिले असल्याचे समजत आहे.
दरम्यान, दीपक केसरकर यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीदरम्यान भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य न करण्याचे आश्वासन दिल्याचं सांगितलं होतं.
केसरकर म्हणाले होते की, भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागणीला सहमती दर्शवली. तसेच फडणवीस यांना देखील उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे. याआधी केसरकर आणि इतर काही बंडखोर आमदारांनी याआधी सोमय्या यांचे ठाकरे यांच्यावर हल्ले सुरू ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
त्यामुळे आता बंडखोर आमदारांना भाजपने उद्धव ठाकरेंबद्दल दिलेलं आश्वासन भाजप पाळणार का हे येणाऱ्या दिवसांत कळेलच. मात्र, सध्या तरी भाजपने एकनाथ शिंदे गटाला ठाकरेबद्दल दिलेल्या अश्वासनामुळे कुठे तरी ठाकरे कुटूंबियांना दिलासा मिळाला असेच म्हणावे लागेल.