शिवसेनेच्या ४० हुन अधिक आमदारांनी बंड केल्यानं शिवसेना अडचणीत सापडली आहे. शिवसेना हा पक्ष ठाकरेंच्या हातून हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली, हा इतिहास महाराष्ट्र जाणतो. मात्र आता स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ४० हून अधिक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. शिवसेनेतला हा सत्तासंघर्ष टोकाला गेलेला असतानाच, आता उद्धव आणि राज या दोघा भावांनी एकत्र यावेत, अशी मागणी पुढं येत आहे.
शिवसेनेवर आलेल्या या परिस्थितीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र यावेत यासाठी पुढाकार घेतला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला महाराष्ट्रातली जनता वैतागली आहे.
उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोघेही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच लेकरं आहेत. अशा परिस्थितीत हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी संकटात सापडलेल्या भावासाठी समोर यावे आणि पूर्वीची भांडणे विसरून एकत्र यायला पाहिजे हे हिंदुत्व शिकवते असे रुपाली पाटील म्हणाल्या,
तसेच, म्हणाल्या की, ज्याप्रमाणे लक्ष्मण रामासाठी उभा राहिला होता तसंच हिंदुत्व लोकांना शिकवणाऱ्यांनी भावासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. दुसरीकडे, सध्याच्या बिकट प्रसंगात उद्धव आणि राज यांनी एकत्र यायला हवं, अशी भावना मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील बोलून दाखवली आहे.
दरम्यान, मशिदीवरील भोंग्यासंदर्भात राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि मनसे वाद टोकाला गेला होता. त्यानंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढं ढकलण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अयोध्या दौरा केला. यानिमित्तानं पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पेटली. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, अशी शक्यता फारच कमी आहे.