पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत; सरकारचे नवे नियम

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देत असते. या योजनेसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11 व्या हप्त्याची कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता पुढच्या म्हणजेच मे महिन्यात होईल. पुढच्या महिन्यात दोन हजार रुपये करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्तापर्यंत10 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत.

आपल्या 11 व्या हप्त्याची शेतकरी एवढ्या आतुरतेने वाट पाहत असताना एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता पुढच्या महिन्यातील हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर, शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करावी लागणार आहे. जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर त्यांना पुढील हप्त्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते.

नुकतेच काही दिवसांपूर्वी, ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता शेतकरी आधार कार्डद्वारे देखील ई-केवायसी करू शकतात. यासोबतच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक केवायसीही शेतकऱ्यांना करता येऊ शकते.

सध्या,  पीएम किसान योजनेबाबत अनेक प्रकारचे नवीन नियम बनवण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार अनेक शेतकरी या पीएम किसान योजनेसाठी पात्र असू शकत नाहीत. जसे की, संस्थागत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही.

जे लोक घटनात्मक पदावर आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा PSU किंवा कोणत्याही सरकारी संस्थेत काम करणारी व्यक्ती शेती करत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे पीएम किसान योजनेच्या नव्या नियमांनुसार सांगण्यात आलेले आहे.