कोणाचा मृत्यू कसा होईल, काही सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून स्वयंपाक करण्यासाठी पाणी आणायला गेलेल्या ट्रक क्लिनरचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
संबंधित घटना जालन्यात घडली आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील नायगाव मंडी येथील ट्रक चालक शंकरसिंह योगी आणि त्याचा चुलत भाऊ प्रेम भवानीनाथ योगी हे दोघे लुधियाना, पंजाब येथून चेन्नईकडे असा टाटा ट्रकमधून प्रवास करत होते. या ट्रकमधून ते मोटरसायकलच्या ट्युब आणि टायरचा साठा घेऊन चेन्नईकडे जात होते.
सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान जालना ते भोकरदन रस्त्यावरील मांडूळगाव शिवरा येथील पोल्ट्री फार्मजवळ जेवण बनवण्यासाठी थांबले. त्यांनी ट्रक तिथेच रस्त्याच्या कडेला उभा केला. ट्रकचालक शंकरसिंह स्वयंपाक करण्याच्या तयारीला लागला. जेवण बनवण्यासाठी पाणी नसल्याने त्याचा भाव प्रेम योगी पाणी आणण्यासाठी गेला.
बराच वेळ प्रेम योगी पाणी घेऊन आला नाही. त्याचा चुलत भाव शंकरसिंह योगी त्याची वाट पाहत बसला होता. थोडा वेळ वाट पाहून देखील प्रेम योगी आला नाही. त्यामुळे त्याच्या शोधात तो निघाला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याला प्रेम योगी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला.
त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला समजले की त्याचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. ज्या गाडीने धडक दिली तो वाहन चालक फरार झाला. तोपर्यंत रस्त्यावर ट्राफिक झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.
संबंधित घटनेबद्दल चंदनझिरा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे अनेकांना हादरा बसला आहे. कारण, कोणाचा जीव कधी आणि कोणत्या कारणाने जाऊ शकतो यावर विचार करून सगळेच दुःख व्यक्त करत आहेत. मृत व्यक्तीचे वय केवळ 35 असल्याने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.