एकनाथ शिंदे हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच कल्याण- डोंबिवली मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सत्ता परिवर्तन घडवून आणत मुख्यमंत्री पदी झेप घेतली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमधील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांना आम्ही कुणासोबत जायचे, असा प्रश्न पडला आहे. अनेकांनी मंगळवारी ‘मातोश्री’ गाठत उद्धव ठाकरे यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगितले.
असे असताना आता या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यांनी कल्याण पूर्वमधील शिवसेना मध्यवर्ती शाखेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे.
पदाधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली त्यात माजी नगरसेवक रमेश जाधव, कैलाश शिंदे, महेश गायकवाड, नीलेश शिंदे, माधुरी काळे, विशाल पावशे, पप्पू पिंगळे, प्रशांत काळे, मनोज चौधरी आदी उपस्थित होते. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे या पदाधिकाऱ्यांचे मन वळवून त्यांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखू शकतात का पाहावं लागेल.
दरम्यान, उल्हासनगर महापालिकेची स्थापना झाल्यापासून सत्तेच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या शहरातील साईपक्षाने आज खासदार शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांच्यासोबत माजी नगरसेवक बाबू मंगतानी, नवीन दुधानी, माजी नगरसेविका इंदिरा उदासी आदींनी शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले, शिंदे हे विकासकामात हेवेदावे, मतभेद करत नसून हा स्वभावच त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत राहणार आहोत.