आमदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटासमोर उरले फक्त ‘हे’ तीन पर्याय; एकच आहे समाधानकारक

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती केली, आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले.

या सगळ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येऊन सरकार स्थापन केलं. विधानसभेत १६३ सदस्यांचं बहुमत असल्याचं शिंदे सरकारनं सिध्द केले. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी होऊनही एक महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती. त्यावरून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी खंडपीठ नेमलं. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह १५ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

पक्षांतर बंदी घटनेच्या १० व्या तरतुदीनुसार शिंदे गटातील समर्थकांचा आता आमदारकी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र, आम्ही शिवसेनेत आहोत असा प्रतिवाद शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

त्यावर आता सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यामुळे निकाल येईपर्यंत सर्वकाही अधांतरी आहे. मात्र, त्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिंदे गटासमोर सध्या ३ पर्यायच उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. त्यात तिसरा पर्याय शिंदे गटासाठी सर्वोत्तम असल्याचं बोललं जात आहे.

प्रकाश महाजन यांनी शिंदे गटासाठी सांगितलेला तिसरा पर्याय म्हणजे, दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची जर वेळ आली तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. कारण, मनसेत विलीन झालं तर, ठाकरे नाव मिळेल, तसेच हिंदुत्वाची प्रखर भूमिका याचा देखील फायदा होईल.

तर, पहिला पर्याय सांगितला, शिंदे गट जर स्वतंत्र्य अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करतील तर भाजपसोबत असलेली बार्गेनिंग पॉवर तेवढीच राहील. कुणीही पक्ष सोडल्याची भाषा केली नाही तर शिवसेना म्हणूनच राहतील. त्यांनी सांगितलेला तिसरा पर्याय म्हणजे, शिंदे गटाला भाजपात विलीन व्हावं लागेल.