तिरुपती देवस्थानने घेतली माघार; यापुढे शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना मिळणार प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता, त्याच्या गाडीमध्ये लावलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तिरुपती संस्थानांनी काढायला लावली, असा व्हिडीओ त्याने शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थानबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. अखेर या प्रकरणात आता तिरुपती बालाजी देवस्थानाने माघार घेतली असून, यापुढे शिवरायांची मूर्ती घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात प्रवेश करताना यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

सध्या खासदार संजय जाधव बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले असून, त्यांनी तिथल्या प्रशासनाची चर्चा केली आणि काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या वादावर तोडगा काढला. यानंतर मंदिर प्रशासनासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, संजय जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले, तिरुपती संस्थाच्या नियमानुसार मंदिराच्या आवारात कोणत्याही राजकीय, सामाजिक पक्षाचा झेंडा, निशाणी, चिन्ह यावर बंदी आहे. मात्र, भाविकांकडून गाड्यांत लावण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मूर्त्यांवर बंदी नाही.

परंतु, आता या छोट्या मूर्त्यां गाडीत असल्यानं यापुढे देखील मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अडवणूक होणार नाही, असे खासदार जाधव म्हणाले. तसेच म्हणाले, तिरुपती तिरुमाला ट्रस्टचे म्हणणे आहे की, भक्तजणांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नाही, सुरक्षिते करता जे काही विचारण्यात येईल त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं.