शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार यांनी बंड करत शिंदे गटात प्रवेश केला, यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र, ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्यासाठी आपले पाऊल टाकले. आता त्यांना अनेक नवीन कार्यकर्ते येऊन मिळत आहेत.
एके काळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात जोरदार भाषण करणाऱ्या फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या सुषमाताई अंधारे या देखील शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्याचीच चर्चा आहे.
आता सुषमाताई अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजपसोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे.
माहितीनुसार, सुषमा अंधारे आज २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
सुषमा अंधारे यांनी काल शिवसेनेत प्रवेश करणार अशी घोषणा केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेकाळी केलेली भाषणे चर्चेत आली. या भाषणांमध्ये सुषमाताई अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या होत्या. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली होती.