पुणे शहरात आजकाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याचं अनेक गंभीर घटनांमधून समोर आलं आहे. काल म्हणजेच बुधवारी 23 मार्च रोजी पुणे शहरात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पाच ते सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.
काल सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एकाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पाच ते सहा जणांनी कोयत्याने सपासप वार केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिक व व्यायसायिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव मारुती लक्ष्मण ढेबे असून, तो केवळ 20 वर्षांचा होता. तो मूळचा धनगरवस्ती नांदेड, तालुका हवेली येथील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुण या रस्त्यावरील बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्याच दरम्यान तोंडाला रुमाल बांधून पाच ते सहा जण तिथे आले. त्यांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला .
अचानक हल्ला झाल्याने तरुणाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी मिळाली नाही. कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याने मारुती ढेबे जागीच कोसळला. त्यानंतर हे पाच सहा जण गाडीत बसून तिथून निघून गेले. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. आसपासच्या लोकांनी हे दृश्य पाहून तेथून पळ काढला.
पुण्यात 'मुळशी पॅटर्न'ची थराराक घटना, तरुणावर कोयत्याने सपासप वार करून संपवलं। @PuneCityPolice @DGPMaharashtra@Dwalsepatil pic.twitter.com/hW751na1Em
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) March 24, 2022
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. मृत तरुणावर कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे का याची पोलीस चौकशी करत आहेत. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक अशोक गिरे हे घटनास्थळी उपस्थित होते.
संबंधित घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, यामध्ये या हल्ल्याचे थरारक दृश्य दिसत आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर अल्टो कारमधून पसार झाल्याचं दिसत आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.