एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठी गळती लागली. अशावेळी शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळाले आहे. तर शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांच्या मुलावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी, खासदार अरविंद सावंत यांची देखील शिवसेना नेतेपद निवड करण्यात आली आहे. तर, पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष कोणाचा, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणूक आयोगानेही तत्परतेने हालचाली करत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते.
संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पक्षात कशाप्रकारे उभी फूट पडली आहे, हे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. त्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती.
या नेत्यांना आपल्या बाजुला वळवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची मानसिकता बदलण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता, मात्र धोका वेळीच ओळखून आता उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे.