विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. काही जणांनी चित्रपटाला सकारात्मकता दाखवून प्रोत्साहन दिलं आहे, तर काहींनी त्याच्या अर्धवट कथेवर शंका उपस्थित केली आहे. अशावेळी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
अनुपम खेर एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ ला विरोध करणाऱ्यांना यावेळी चांगलेच सुनावले आहे. त्यांनी म्हंटले की, ज्यांना वाटते की या चित्रपटात अपूर्ण सत्य दाखवण्यात आले आहे, ते स्वत:चे सत्य मांडू शकतात. अशा लोकांनी स्वत:चा चित्रपट बनवून लोकांना सत्य काय ते दाखवावे.
तसेच त्यांनी चित्रपटाची निंदा करणाऱ्यांना ‘खिसियानी बिल्ली खंभा नोचे’ असे म्हटले आहे. म्हणाले, काश्मिरी पंडितांच्या पलायनाची शोकांतिका गेल्या 32 वर्षांपासून लोकांपासून लपवून ठेवण्यात आली होती, कोणीही ते दाखवत नव्हतं. आजपर्यंत काश्मीरवर अनेक चित्रपट झाले, मात्र कोणीही त्यांची खरी स्थिती दाखवली नाही.
त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये अपूर्ण सत्य दाखवले आणि इतिहासाचा विपर्यास केला आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांना माझा सल्ला आहे, त्यांनी त्यांचे सत्य दाखवावे, त्यांचा स्वतःचा चित्रपट बनवावा.
तसेच म्हणाले, आजपर्यंत काश्मीरवर चार-पाच चित्रपट बनले आहेत, मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, पण त्यापैकी कोणीही काश्मीर पंडितांच्या वेदना दाखवल्या नाहीत, त्यांची खरी कहाणी दाखवली नाही. तेव्हा, त्या चित्रपटावरून कोणीही म्हटले नाही की, तुम्ही दहशतवाद्यांना ग्लॅमरस करून चित्रपट बनवत आहात.
त्यावेळी, पाच लाख काश्मीरी पंडितांना तिथून हाकलून दिले आहे. आता सत्य दाखवणाऱ्या सिनेमावर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. आता सत्य समोर आले आहे. असे ते म्हणाले, यावेळी त्यांनी चित्रपटाबद्दल नकारात्मक बोलणाऱ्यांना ‘ खिसियानी बिल्ली खंभा नोचे’ असे म्हटले आहे.
खिसियानी बिल्ली खंभा नोचे’ याचं स्पष्टीकरण देत पुढे म्हणाले, ज्या वस्तीत आपण राहायचो, तिथे एखादा मुलगा अभ्यासात पहिला यायचा, तेव्हा आपण त्या मुलाला म्हणायचो की हा मुलगा खूप वाचतो, म्हणूनच तो नेहमी पहिला येतो. मात्र, तो इतर गोष्टींमध्ये चांगला नाही असे म्हणणारे देखील काही असतात. असे होतच राहते, असे ते म्हणाले.