शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे . त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या प्रकरणावर दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह सुरत गाठले, त्यानंतर आसाम रवाना झाले. एवढ्या मोठ्या आमदारांना सोबत घेऊन ते भाजपशी वाटाघाटी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्या सर्व आमदारांना शिवसेनेने इशारा दिला आहे. गुजरातच्या भूमीवरुन फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळाव्या, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच, असं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून त्यांना इशारा देण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. यात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्र वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करेल काय? हे खरे प्रश्न आहेत.
संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरुन फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळाव्या, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच, असे म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे दुपारनंतर मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे ४० आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे.






