रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ,इतर मंत्री, आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यात एका हॉटेलमध्ये जाऊन वडा पाव, भजी पाववर ताव मारला आणि चहा, नाश्ता झाल्यानंतर हॉटेलचे बिल न देता निघून गेले. या प्रकरणामुळे चर्चेला उधाण आले. याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
घडलेली घटना अशी, रेल्वे मंत्री दानवे ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेले आणि तेथे त्यांनी वडा आणि भजीपाववर ताव मारला. नाश्ता करताना हे सगळे अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले. मात्र चहा, नाश्ता झाल्यानंतर हॉटेलचे बिल न देता मंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघून गेले. हा सर्व प्रकार ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याच्या हॉटेलमध्ये घडला.
हॉटेल विक्रेत्याने सोशल मीडियावर या गोष्टींचा खुलासा केला. सोबतच या संदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या हॉटेल मालकाचे पैसे दिले. या सगळ्याचे बिल ३९५० रुपये इतके झाले होते. बील जमा झाल्यानंतर गजानन हॉटेलच्या मालकांनी या वादावर पडदा टाकला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फुकट वडापाव खाणाऱ्यांवर टीका केली आहे.
उल्हासनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.यावेळी त्यांनी या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांवर बोचरी टीका केली. ‘फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमचं शहर सांभाळण्याची औकात नाही.’ अशी टीका त्यांनी केली.
ठाणे आणि दिव्यादरम्यान रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाण्याच्या गजानन हॉटेल मध्ये कार्यकर्त्यांनी वडापाव,भज्यांचा आस्वाद घेतला होता.
यावेळी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला. त्याचवेळी ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या गजानन वडापाव सेंटरमध्ये गेलेले होते.