एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. त्यानंतर भाजपसोबत जाऊन शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. मात्र, त्यांच्या या नियुक्तीला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. आता बहुसंख्य आमदार गमावल्यानंतर पक्षाचं निवडणूक चिन्ह देखील ठाकरे गट गमावणार अशा चर्चा आहेत.
काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत. त्यांनी म्हटले की, शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच म्हणाले, सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तिवात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. म्हणाले, जे १५-१६ आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतूक करायचं आहे. अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय होतोच असे ते म्हणाले.
तसेच म्हणाले, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या १२ तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल, असे ठाकरे म्हणाले.
विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा. शिवसैनिकांनी संभ्रम मनात ठेवू नाही. शिवसेनेनं सध्या माणसाला मोठं केलं आहे. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही. कट्टर शिवसैनिक आहेत, तोपर्यंत पक्षाच्या भवितव्याला धोका नाही. असेही ठाकरेंनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला देखील खडसावलं आहे. म्हणाले, ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेल्या धृतराष्ट्राचं राज्य नाही, असे ठाकरे म्हणाले.