19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने पाचव्यांदा करंडक उंचावला आहे. अंतिम सामन्यात उप कर्णधार रशीद शेख याने अर्धशतकी खेळी केली. वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी साकारली आहे. सेमीफायलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 108 चेंडूत 94 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामागे नक्कीच अफाट संघर्ष आहे.
रशीद शेख परिस्थितीशी झुंज देऊन, संघर्ष करुन इथवर पोहोचलाय. यामध्ये त्याचे वडील बालिशा यांचे खूप मोठे योगदान आहे. मुलाला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्याची त्यांची धडपड, जिद्द, मेहनत यामुळेच आज हा दिवस पाहता आला. बालिशा यांनी परिस्थिती समोर हार मानली नाही. त्यांनी मेहनत करून मुलाच्या टॅलेंटला न्याय दिला.
रशीद शेख याच्या मागे त्याच्या वडिलांनी केलेल्या संघर्षाबद्दल बोलताना राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले,“शेख रशीदच्या यशाचं बरचस श्रेय त्याचे वडिल बालिशा यांना जातं. सामान्य कुटुंबातून आलेला रशीद विनम्र स्वभावाचा मुलगा आहे. त्याचे वडील एका किटकनाशकाच्या दुकानात काम करतात असं मला सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी कधी त्यांच्या मुलाला मोठी स्वप्न बघण्यापासून रोखलं नाही”
रशिद आंध्र प्रदेशातील गुंटुरमध्ये राहतो आणि त्याच्या घरापासून 50 किमी दूर मंगलगिरी इथं त्याची क्रिकेट अकादमी होती. तरीही त्यानं कधीच सरावाला दांडी मारली नाही. त्याचे वडील बालीशा त्याला गाडीवरून दररोज 50 किमी दूर असलेल्या क्रिकेट अकादमीत घेऊन जायचे. दररोज 50 किमी प्रवासामुळे त्यांना कामावर जायला वेळ व्हायचा. यामुळे त्यांना त्यांची नोकरीसुद्धा गमवावी लागली.
रशीद 10 वर्षाचा होण्याआधी वडील बलिशा उपजिवीकेच्या शोधात हैदराबादला गेले. त्यावेळी आंतरजिल्हा स्पर्धांमध्ये रशीद चांगली कामगिरी करत होता. वयाच्या नवव्यावर्षी रशीदची आंध्र क्रिकेट प्रबोधिनीमध्ये निवड झाली. तिथे रशीदला सर्व सुविधा मिळाल्या. रहाण्यासाठी वसतिगृह, कपडे, जेवण आणि शिक्षण सगळ्याची व्यवस्था तिथे होती. अकदामीच शाळेची फी सुद्धा भरायची.
प्रसाद यांनी सांगितले की, रशीद सारख्या 30 ते 35 क्रिकेटपटुंना आंध्र क्रिकेट अकादमीनं दत्तक घेतलं. प्रत्येक मुलावर अकादमी महिन्याला 15 हजार रुपये खर्च करायची. रशीदची धावांची भूक आणि क्रिकेटबद्दलची प्रतिबद्धता तिथेच घडली” असाच वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रवास करत शेख रशीद अंडर 19 च्या संघापर्यंत पोहोचला.
रशिदची निवड आंध्र प्रदेशच्या अंडर-14 संघात झाली. त्यानंतर 2018-19 मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीत त्याने 674 धावा काढल्या. यात तीन शतकांचाही समावेश होता. गेल्या वर्षी विनू मांकड ट्रॉफीत त्यानं 6 सामन्यात 376 धावा केल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंडर-19आशिया कपसाठी त्याची निवड झाली.