गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा असणार याबाबत पेच निर्माण झाला होता. मात्र, काल मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी करत उद्धव ठाकरेंना या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
दरम्यान, मेळाव्यासाठी शिवाजी पार्क पाहिजे असे म्हणत शिंदेंनी या मैदानाची आणि दसरा मेळाव्याची उत्सुकता बरीच वाढवली होती. परंतु, मधल्या काळात शिंदे गटाने बीकेसीचे मैदान बुक केले, यामुळे या प्रकारची खेळी करण्यामागे शिंदेंचाच हात असल्याची चर्चा आहे.
मैदानाचा एकूण आकार लक्षात घेतला तर समजेल की, बीकेसीच्या तुलनेत शिवाजी पार्क छोटे आहे. त्यामुळे शिवाजी पार्कच्या तुलनेत बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्याला शिवसेनेपेक्षा अधिक श्रोते जमवून शिंदेंना एकप्रकारे शक्ती प्रदर्शनच करायचे असल्याचे सांगितले जात आहे.
मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारीदेखील केली जात आहे. यासाठी बस, ट्रेनचे बुकिंग सुरू करण्यात आले असून, शिंदे गटाच्या मेळाव्याला मुंबईला जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातूनच मुंबईकडे जाणाऱ्या ३ रेल्वेगाड्या बुक करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
एवढेच नाही तर, शिंदे गटाकडून या प्रत्येक ट्रेनसाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तब्बल ७५ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून मेळाव्यासाठी नागरिकांना आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
माहितीनुसार, शिंदे गटात जळगावातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह एरंडोलचे चिमणराव पाटील, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, पाचोऱ्याचे चंद्रकांत पाटील व चोपड्याच्या लता सोनवणे असे एकूण ५ आमदारांनी त्यांच्या प्रत्येक मतदारसंघातून मेळाव्यासाठी नेण्याच्या गर्दीचे नियोजन झालं असल्याचं म्हटलं आहे.