शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्र राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे दिग्गज नेतेमंडळी आणि आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे सध्या शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. शिंदेंच्या गटाकडून महाविकास आघाडी सरकार कोसळून नवे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं मानलं जात आहे.
शिंदे यांच्या गटाने पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेवर मोठं संकट कोसळलं आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांनी सेनेला आवाहन दिले आहे. शिंदे यांनी म्हटलं की, आताची शिवसेना ही खरी नसून आसाममध्ये एकत्र आलेल्या आमदारांची सेना हीच खरी शिवसेना आहे. जे बाळासाहेबांच्या विचारांवर आणि सेनेच्या कृतीवर चालते.
तर दुसरीकडे फुटणारी सेना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहोत मात्र सगळ्यांनी परत या अशी भावनिक साद घातली. त्यानंतर राज्यात शिवसेनेची खरी ताकद असाणारा सामान्य शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे.
जळगाव येथील शिवसैनिकांनी तर आपले प्रेम आणि सेनेप्रति असणारी निष्ठा दाखवून दिली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील शिवसैनिकांनी रक्ताने पत्र लिहून आपले समर्थन हे उद्धव ठाकरे यांना असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच याचवेळी त्यांनी जे आमदार फुटले आहेत त्यांनाही भावनिक साद घातली आहे.
तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांना पुन्हा परत येण्याचे भावनिक आवाहन या शिवसैनिकांनी केले आहे. शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात मागे फिरा, आपल्या पक्षात पुन्हा सामील व्हा असं आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आहे.
या शिवसैनिकांनी भडगाव येथे चांगलंच शक्तिप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुमारे साथ है, अशा घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले, या पत्रात त्यांनी आपण शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासन दिलं. तसंच रक्त सांडून उभी केलेली संघटना कोणालाही हिसकावून देणार नाही, असे पत्रात लिहिले.
दरम्यान सेनेच्या चाळीस पेक्षा जास्त आमदारांनी सत्येविरोधात बंड पुकारल्यामुळे राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर शिंदे यांच्या नेतृत्वात बहुतांश आमदार आसाम राज्यातील गुवाहाटी येथे मुक्कामी असल्याने शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे भवितव्य देखील संकटात आहे.