मुखी विठूनामाचा जयघोष अन् हातात भगवा ध्वज घेऊन असंख्य वारकरी आता विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूर मार्गे रवाना झाली आहेत. या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक संस्था मदतीला धावून येत आहेत. अशातच आता वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी मराठी अभिनेत्री पुढे आली आहे.
वारकऱ्यांची सेवा करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कश्मिरा कुलकर्णी आहे. ही अभिनेत्री यंदा वारीला गेली असून, तिथे ती वारकऱ्यांची सेवा करत आहे. कश्मिराने नुकताच तिच्या इन्स्टग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे.
कश्मिराने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, पंढरीची वारी, वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे. महाराष्ट्रीय जनविश्वासाव्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय.
तसेच पुढे लिहिले की, इथे माणसांमधला देव पाहता येतो माणुसकी, सेवाभाव, भक्ती, आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येते. अशाच एका वारीचा अनुभव असे कश्मिराने लिहिले आहे. तिच्या या व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तिने व्हिडीओमध्ये तिच्या संस्थेबद्दल माहिती दिली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये ती कधी वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना, कधी त्यांना जेवण देताना तर कधी वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून देताना दिसत आहे. ही सेवा करत असताना ती या भक्तिमय वातावरणाशी एकरूप झालेली पाहायला मिळत आहे.
कश्मिरा कुलकर्णी ही मूळची सांगलीची सध्या ती पुण्यात वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच तिने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. कश्मिरा अवघ्या ४ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे घर चालवण्यासाठी आईने सोनाराच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. गरिबीचे चटके सोसत असतानाच वयाच्या १३ व्या वर्षीच तिने आपल्या आईला देखील गमावले होते.