आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. यामुळे आता एकीकडे सर्वसामान्यांचे हाल होणार तर दुसरीकडे खाद्य तेलाच्या कंपन्यांची मात्र दिवाळी होणार.
आता खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसून त्यांचे बजेट कोलमडणार आहे. अचानक खाद्य तेलाच्या किमती वाढण्याचे कारण म्हणजे, इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. 28 एप्रिल पासून इंडोनेशियाने पाम तेलावरील बंदी लागू केली आहे.
इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारताला प्रचंड फटका बसणार आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील पाम तेलाच्या बाजारापेठेबद्दल सांगायचे झाल्यास, भारत आपल्या गरजेच्या 50 टक्के पाम तेलाची आयात इंडोनेशियाकडूनच करतो. भारत हा खाद्य तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.
भारत आपल्या आवश्यकतेच्या जवळपास 50 टक्के खाद्य तेल आयात करतो. त्यामुळे इंडोनेशियाच्या निर्णयाचा आता भारतावर प्रतिकूल परिणाम होईल. सर्वसामान्यांना याचा फार मोठा फटका बसेल. तर दुसरीकडे अदानी विल्मर आणि रुचि सोया या दोन कंपन्यांना दणकून फायदा होणार आहे.
खाद्य तेलाच्या बाजारपेठेवर अदानी विल्मर आणि रुचि सोया या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. अदानी विल्मर ही अदानी समूहाची कंपनी आहे. तर रुचि सोयाची मालकी बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेडकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतातील या दोन कंपन्यांना प्रचंड फायदा होणार आहे.
अदानी विल्मर आणि रुचि सोया या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स सध्या तेजीत आले आहेत. अदानी विल्मरचा शेअर फक्त पाचच दिवसात 25 टक्क्यांनी वाढला. तर रुचि सोया या शेअरच्या किमतींत पाचच दिवसात 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता अदानी आणि बाबा रामदेव यांच्या कंपन्यांची दिवाळी सुरू आहे.