छत्रपत्री शिवाजी महाराज शत्रूंसोबत लढण्यासाठी जी दूरदृष्टी ठेवत होते, तीच त्यांनी सामाजिक कल्याणाची कामं करताना देखील नेहमी ठेवली. त्यांचा इतिहास पाहिल्यावर अनेक गोष्टींतून याचा प्रत्यय येतो. शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या अशाच एका पुलाबद्दल आम्ही तुम्हांला सांगणार आहोत, जो पूल आजही सेवेसाठी भक्कम उभा आहे.
जावळीचं खोरं म्हटलं की आपल्याला आठवतो तो इतिहासाची साक्ष असणारा प्रतापगड. जावळीच्या खोऱ्यामुळे पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना नदीच्या जोरदार वाहणाऱ्या प्रवाहामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला नेहमी पाणी असायचे म्ह्णून जाण्यायेण्यासाठी अडचणी निर्माण व्हायच्या.
पावसाळ्यात या भागातून प्रवास करणं फार मुश्किलीचं असायचं, गावाचा संपर्क पूर्ण खंडीत व्हायचा. यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उत्तम उपाय शोधला. त्यांनी जिथे पावसामुळे अडचणी होतात, त्या भागाची पाहणी केली. तिथे त्यांनी जनतेच्या सोयीसाठी दगडी चिऱ्यांचा पूल उभारला.
हा पूल त्यावेळी ओळखल्या जाणाऱ्या पार्वतीपूर गावात म्हणजे आत्ताच्या पार गावाजवळ आहे. या दगडी चिऱ्यांच्या पुलाची लांबी बावन्न मीटर लांब आहे, तर उंची ही पंधरा मीटर उंच आहे. त्याची रुंदी आठ मीटर इतकी आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी अवघ्या काही महिन्यात हा पूल बांधून घेतला आहे.
पुलासाठी लावलेला प्रत्येक दगडी चिऱ्यांचा काटकोनात घडवलेला, प्रत्येक दगड एका आकाराचा आणि वजन जर केलं तर कदाचित एकाच वजनाचा भरेल इतकं अचूक काम या पुलाचे आहे. पुला खालून पाण्याच्या प्रवाहाने येणारे लाकडी ओंडके किंवा इतर काही चीज वस्तूंमुळे पुलाच्या खांबाला धोका पोहचू नये म्हणून ते खांब काटकोनात बांधले आहेत. ज्यामुळे पाण्यासोबत आलेली वस्तू या काटकोनी खांबांना आदळून त्याचे दोन भाग व्हावेत अशी देखील यंत्रणा आहे.
मात्र, त्याकाळी बांधलेला हा पूल अजूनही भक्कपणे उभा आहे. साडे तीनशे वर्षे उलटून सुद्धा ऊन वारा आणि मुसळधार पावसात पूल आपला तग धरून उभा आहे. हा पूल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती याचं उत्तम उदाहरण सांगता येईल.
या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह स्वराज्याच्या मावळ्यांचा प्रवास पावसातही सोपा झाला. गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाकडे पाहिल्यावर कळून येईल की आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आणि भल्याभल्या अभियंत्यांना देखील लाजवेल असाच हा पूल आहे.