सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. युक्रेनची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न भारताकडून होतायत. त्यातच आता नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थी एका बस मधून युक्रेन मधून बाहेर पडत असताना जे वर्तन करत आहेत त्यावर लोक प्रचंड चिडले आहेत.
रशियाने लादलेल्या युद्धामुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. बॉम्बहल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना अन्न, पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत.
रशियाच्या फौजांनी ईशान्य युक्रेनमधील खारकिव्ह शहराला वेढा घातल्याने त्याचा फटका तेथील भारतीय विद्यार्थ्यांनादेखील बसू लागला आहे. खारकिव्हमध्ये वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि पाण्याची कमतरता असल्याने प्यायच्या सोड्यासाठी लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. जीव धोक्यात खालून त्यांना अन्न पाण्यासाठी बाहेर जावं लागत आहे.
त्यातच युक्रेन सोडून पोलंडला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले झालेले समोर आले. अशा वेळी भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणले गेले, तर काहींना पोलंडमध्ये सोडवण्यात येत आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना बस मधून पोलंडला सोडवत असतानाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एका गाडीत काही विद्यार्थी दिसत आहेत. आपण पोलंडला जात असल्याचे ते सांगत आहेत. त्यातच ते हास्यविनोद करत ‘हमे बचा लिजिए’ अशी टर उडवत आहेत. काहीजण हसत आहेत.
काहीजण ‘नो पॅनिक प्लिज’ असं म्हणताना दिसून येत आहेत. तर ‘नो मोअर युक्रेन’ असंही ते म्हणत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये गंभीर परिस्थिती असताना अशाप्रकारे टर उडवणं अत्यंत लज्जास्पद असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होतेय. काहींनी या व्हिडीओवरती आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, अशांना तर उत्तर कोरियातच सोडावं, यांच्यात कोणताही सेवाभाव दिसत नाही. आधी मदतीसाठी ओरडत होते. आता वाचवलं तर खिल्ली उडवतायत. या व्हिडीओ वरती अनेकांनी चीड व्यक्त केली आहे.






