Share

रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

नुकतीच छत्रपती संभाजीराजे यांची राज्य शासनासोबत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काहीच चर्चा झाली नाही, तसेच मराठा मोर्चाच्या नेत्यांना बोलूच दिले नसल्याने मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत.

शुक्रवारी या मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी गुरुवारी राज्य शासनासोबत झालेल्या बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे छत्रपती संभाजीराजेंवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नाराज असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या प्रशासनासमोर स्पष्टपणे मांडणाऱ्या संघटनांमध्येच मोठी फूट पडल्याचे पुढे आले आहे. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानुसे यांनी राज्य शासनासोबत झालेल्या बैठकीत घडलेल्या प्रकरणाबाबत वक्तव्य केलं आहे.

डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनातर्फे गुरुवारी एक बैठक बोलावली होती. मुंबईत झालेल्या या बैठकीत औरंगाबादमधून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वतः भानुसे यांना बोलावण्यात आले होते.

कोटकर, भराट आमि वेताळ यांना बैठकीमध्ये प्रवेशच देण्यात आला नाही. बैठक सुरु होण्याच्या आधीच छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीत कुणीही बोलू नका, नाही तर मी बैठक सोडून निघून जाईन, असे सांगितले, अशा प्रकारे प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेत रवींद्र काळे,चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, पंढरीनाथ गोडसे, शैलेश भिसे, सुरेश वाकडे, अरुण नवले, सुकन्या भोसले, रवींद्र वाहटुळे आदी मराठा नेत्यांची उपस्थिती होती. आता या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पुढे काय घडते पाहावं लागेल.

दरम्यान, छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व आहे, तुम्ही अंधारात बैठका घेता नेमकं तुमचं चाललंय काय? रात्रीच्या अंधारात हे बैठका घेतात. मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करणारे कुणीही नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातून मोर्चा सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या मोर्चाचे शिलेदार आहोत, असे मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now