सध्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. शिवसेनेचे बहुसंख्य खासदार आणि आमदार शिंदे गटात प्रवेश करत आहेत. तसेच शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांची हकालपट्टी करण्याचं काम शिवसेनेत सुरू आहे. या बंडखोरीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला मराठवाड्यात बसला आहे.
शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यात औरंगाबाद येथील शिवसेनेच्या नियुक्तीवरून आता वाद निर्माण झाला आहे. किशनचंद तनवाणी यांच्या नियुक्तीवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
औरंगाबाद पदाधिकारी नियुक्तीबाबत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं समोर आले आहे. किशनचंद तनवाणी यांची औरंगाबादच्या जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. परंतु, त्यांना दिलेल्या नव्या जबाबदारीवरून खैरे आणि दानवे यांच्यात वाद झाला आहे.
माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्यासमोरच या दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याने, ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांना सुनावलं आणि बाजूच्या खोलीत जाऊन तोडगा काढा, तोडगा काढल्यानंतरच माझ्यासमोर या असं सांगितलं. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी तनवाणी यांना जिल्हाप्रमुखपदाऐवजी महानगर प्रमुख पद देण्यावर एकमत झालं.
स्वतंत्र जबाबदारी देण्यावरून सहमती झाली आणि खैरे- दानवे यांच्यातील वाद मिटवण्यात आला. माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची उचलबांगडी करत तनवाणी यांना महानगर प्रमुख पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.
यामुळे जैस्वाल आणि तनवाणी यांच्या मैत्री आणि प्रतिस्पर्धेचा नवा अंक आता पाहण्यास मिळणार आहे. औरंगाबादमध्ये विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील शिंदे गटात सामील आहेत. दरम्यान, सत्तांतरानंतर शिंदे गट आता पक्षावर देखील वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बंडखोरांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करत आहेत.