Share

खातेवाटपानंतर शिंदे गटातील ‘हे’ पाच मंत्री नाराज; एक मंत्री नॉट रिचेबल तर…

शिंदे फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर काल सरकारने खाते वाटप देखील जाहीर केले. या खातेवाटपाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कारण खातेवाटपानंतर शिंदे गटातील अनेक मंत्री नाराज झाल्याचं समोर येत आहे.

शिंदे सरकारच्या खातेवाटपावर नजर मारल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक लक्षात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अनेक महत्वाची खाती स्वतः कडे घेतली आहेत. वजनदार खाती भाजपकडे तर शिंदे गटाला देण्यात आलेली खाती ही साधारण असल्याचं दिसून येत आहे.

त्यातच, शिंदे गटातील ज्या मंत्र्यांना खाती वाटप झाली आहेत, त्यातील काही नेते नाराज असल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटातील पाच मंत्री नाराज असल्याचं बोललं जात आहे. माहितीनुसार, दादा भुसे यांचा मोबाईल स्विच ऑफ येत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

तसेच गुलाबराव पाटील, संजय राठोड, दिपक केसरकर आणि संदिपान भुमरे हे मिळून पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी आधीच आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, ही खाती आली.

तसेच, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ खाते आहेत. तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग शिंदे गटाला मिळाले. तर महत्वाची खाती भाजपकडे गेल्यामुळे या खातेवाटपात भाजपचा वरचष्मा दिसत आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now