महाराष्ट्रातील आणि विशेषत: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक बातमी आहे. कारण काल तुमसरमध्ये पावसानं लावलेल्या जोरदार हजेरीनंतर आता महाराष्ट्र हवामान खात्यानं भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या विविध पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे.
भारताच्या मध्यवर्ती भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं पूर्व विदर्भातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. लाखांदूर, साकोली, तुमसर व लाखनी या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं या परिसरात पावसाची शक्यता जास्त आहे.
अतिवृष्टीच्या शक्यतेमुळं आता विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतात गहू, चणा, वाटाणा, आणि कडधान्यांचं पिक शेतात असल्याने ह्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच विविध शेतकऱ्यांनी त्यांचा माल कृषि उत्पन्न बाजार समितीत आणलेला असल्यानं पाऊस झाला तर त्याला वाचवायचं कसं असा प्रश्नं आहे.
त्यामुळं याविषयी प्रशासनाकडूनही शेतकऱ्यांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात थंडीचा कहर कमी होताना दिसत असून, उन्हाचा चटका वाढत आहे. फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच नागरिकांना आता उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत.
महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच तापमानात चढ उतार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पर्व भारतासह विदर्भात ढगाळ हवामान आहे. त्यामुळं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वातावरण पाहायला मिळत आहे.
धुळे जिल्ह्यात आज पुन्हा तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्ह्यातील किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअसवर आले आहे. त्यामुळं वातावरणात बदल झाल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये यात अजून काही बदल होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.