नुकतेच संतोष परब हल्ला प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली म्हणून त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी ‘माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता,’ असा आरोप नितेश राणेंनी विधानसभेत केला आहे.
नितेश राणे यांनी विधानसभेत सांगितले की, सिंधुदुर्गातून कोल्हापुरातील जिल्हा रुग्णालयात मला उपचारासाठी दाखल केलं होतं. तेव्हा डॉक्टर माझ्याकडे आले, आणि त्यांनी मला सीटी अँजिओग्राफी करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. मी नकार दिला मात्र त्यांनी करावीच लागेल असे सांगितले. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने येऊन मला सतर्क केले, आणि माझे प्राण वाचले.
नितेश राणे म्हणाले, माझ्याकडे रुग्णालयातील एक कर्मचारी आला त्याने मला सीटी अँजिओग्राफी करू नका, त्यानिमित्ताने तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही ते करण्यास परवानगी देऊ नका, असे सांगितले. तेव्हा मी सतर्क झालो आणि नकार दिला. यावेळी त्यांचा इशारा ठाकरे सरकारवर होता.
नितेश राणे यांनी विधानसभेत दिलेल्या या माहितीमुळे एकच खळबळ उडाली. तसेच म्हणाले की, राज्यात गुन्हे वाढत आहेत. पण राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे. राज्य सरकारकडे विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे फक्त काम राहिले आहे.
पालिकेला तर काहीच काम राहिले नाही. पालिकेच्या आयुक्ताला फक्त आता लोकांच्या घराची मेजरमेन्टची काम राहिले आहे. यांना विचारले तर हे म्हणतात की वरुन आदेश आले. नेमके वरून आदेश येतात तरी कुठून? असा नितेश राणे यांनी प्रश्न करत, राज्य सरकारवर शाब्दिक हल्ला केला.
दरम्यान, त्यांनी राज्यातील पोलिसांवर देखील टोला लगावला. म्हणाले, पोलिसांनी आता कामावर लक्ष द्यावे, जनतेवर लक्ष द्यावे. नितेश राणे काय करतात, कोणते कपडे घालतात याकडे लक्ष देऊ नये असाही टोला त्यांनी लगावला. त्यांच्या एकूणच विधानसभेतील वक्तव्याने सभागृहात काही वेळ खळबळजनक वातावरण निर्माण झालं होतं.