Share

तिकिटासाठी पैसे नाहीत, म्हणून तरुणाने एसटीच्या पाठीमागे लटकून केला प्रवास; पाहा फोटो

तिकिटासाठी पैसे नाहीत म्हणून एक तरुण चक्क बसच्या पाठीमागे असणाऱ्या शिडीला लटकून प्रवास करत असल्याचं समोर आले आहे. सध्या या तरुणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तरुण जीवाची पर्वा न करता एसटी महामंडळाच्या बसला पाठीमागे लटकला आहे.

संबंधित प्रकार हा जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून समोर आला आहे. जालन्याला कामानिमित्त आलेल्या एका तरुणाकडचे पैसे संपल्याने गावाकडे घरी कसे जायचे? असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आणि तो चक्क मजबुरीने जीवाची पर्वा न करता एसटी महामंडळाच्या बसला पाठीमागे लटकला.

मंगळवारी दुपारी चार वाजेदरम्यान जालना- भोकरदन मार्गावर हा प्रकार दिसला. माहितीनुसार, भोकरदन शहरातील भुसार व्यापारी सांडू नामदे नामक व्यक्ती मंगळवारी जालना येथील बाजार समितीत कामानिमित्त गेले होते. दुपारी काम आटोपून गावाकडे जात असताना त्यांना जालन्याकडून भोकरदनकडे जाणाऱ्या एका एसटी बसच्या पाठीमागे असलेल्या शिडीला एक युवक लटकलेला दिसून आला.

त्यांनी या युवकाला इशारा देखील केला आणि असे एसटीच्या मागे का लटकत आहेस अशी विचारपूर देखील केली. त्यावेळी तरुणाने आपल्याकडे प्रवासासाठी पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळे मजबुरीने असे एसटीला लटकल्याचे इशारा करून सांगितले. व्यापारी नामदे यांनी तुला मी माझ्या गाडीत सोडवतो असे सांगितले.

मात्र, एसटीला लटकणाऱ्या त्या तरुणाने नकार दिला आणि हात जोडले. या सर्व प्रकारात महामंडळाची बस वेगाने पुढे निघून गेली. मात्र, मजबुरी माणसाला किती जीवावर खेळण्यास भाग पाडते. ते या वरून दिसून येते. सांडू नामदे म्हणाले, मी जीवनात पहिल्यांदा प्रत्यक्ष असा थरार अनुभवला आहे.

तसेच म्हणाले, त्या तरुणाला हातवारे करून अनेकदा माझ्यासोबत माझ्या वाहनात ये असे म्हटले. मात्र, असा जीवघेणा प्रवास करण्याची त्याची नेमकी मजबुरी कळाली नाही. हातवारे करून त्याने पैसे नाही असे म्हणताच माझ्या अंगावर शहारे आले, असे नामदे म्हणाले. त्यांनी या तरुणाचा फोटो सोशल मीडियावर टाकला.

इतर

Join WhatsApp

Join Now