सध्या देशात मस्जिद आणि मंदिर या मुद्यावरून धार्मिक वातावरण गढूळ होत असल्याचे चित्र दिसत आहे. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावाने धार्मिक एकतेचा संदेश देणारे कार्य करून, समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
औरंगाबादहून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या नारायणपूर या गावातून एक बातमी समोर येत आहे. या गावातील मुस्लिमांनी पुढाकार घेऊन ३५० वर्षे जुन्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळे या गोष्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
नारायणपूर या गावचे वैशिष्ट्य म्हणजे, या गावाची एकूण ३५०० लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जमातींची संख्या ४०० आहे, तर गोसावी समाजाची ३०० एवढी संख्या आहे. गावात फक्त २ ते ३ शीख कुटुंबे आहेत. गावातील मुस्लिमांची संख्या सगळ्यात जास्त म्हणजे २८०० एवढी आहे.
गावात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावात एकही हिंदू कुटुंब वास्तव्यास नाही. या गावात एक जुने हनुमान मंदिर आहे, माहितीनुसार, ३५० वर्षे जुने हे मंदिर असून, त्याची पूर्णपणे पडझड झाली होती, अशावेळी गावातील मुस्लिम सरपंचाने पुढाकार घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला.
या मुस्लिम सरपंचाने कोणताही भेद न करता पूर्ण भावनेने या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. या मुस्लिम सरपंचाचे नाव नासीर पटेल आहे. सरपंचाने घेतलेल्या निर्णयाला गावातील मुस्लिम आणि इतर धर्माच्या लोकांनी देखील साथ दिली.
त्यानंतर, गावकरी व मित्र मंडळींच्या सहकार्याने फेब्रुवारी महिन्यात मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले. आता हनुमान मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. हे मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले आहे. कोणताही धार्मिक भेद न बाळगता लोकांनी एकत्र येऊन हे मंदिर उभा केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.