महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर, मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.
राज्यपालांच्या विधानामुळे सर्वच पक्षातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील राज्यपाल यांच्याविरोधात राज्यभर आंदोलनं सुरू केली. हे राज्यपाल नाही तर भाज्यपाल असल्याची टीका राष्ट्रवादीकडून होऊ लागली. त्यानंतर आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल काय बोलायचे हे सांगणे कठीण झालंय. याआधीही एकदा महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल भयानक स्टेटमेंट त्यांनी केलं. आताही त्यांनी वेगळ्या पद्धतीने पुनरावृत्ती केली.
मुंबई आणि महाराष्ट्र बाकी जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या लोकांना घेऊन जाणारे राज्य आहे. इथे जी मुंबईची प्रगती झाली ती सर्वसामान्य माणसाच्या कष्टातून झाली, घामातून झाली, असे असताना अशा प्रकारची विधानं करणं शहाणपणाचं लक्षण नाही.
म्हणाले, मी त्याच्या खोलात जात नाही, कारण, राज्यपालांच्या डोक्यावर जी टोपी आहे, त्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण त्याच्यात काही फारसा फरक नाही, असे म्हणत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाना साधला.
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह सर्वच विरोधकांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. राज्यापालांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहेत.