आज देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत आहे. राजकीय नेते देखील आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करत आहेत. अनेक जण सणानिमित्त सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या नवनिर्वाचित उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली पोस्ट देखील प्रचंड व्हायरल होत आहे.
सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज फेसबुक पोस्ट टाकून शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मातोश्रीवर गेले होते, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
म्हणाल्या, पहिल्याच भेटीतलं उद्धव साहेबांचं पहिलंच वाक्य होतं , “ताई तुम्ही अत्यंत चुकीच्या वेळेला माझ्याकडे आलात माझ्याकडे द्यायला काहीच नाही” राजकारणात इतकं सरळ आणि इतकं स्पष्टपणे कुणी कसं बोलू शकतं? असे त्या म्हणाल्या.
पुढे लिहितात, क्षमता असेल किंवा नसेल पण किमान कार्यकर्ता आपल्याला जोडूनच घ्यायचा आहे म्हणून तरी पुढारी खोटी वचनं. आश्वासन किंवा आमिष दाखवेल. पण यातलं काहीच घडलं नाही. उलट ते मला सांगत होते की, मी काहीच देऊ शकत नाही मी एकटा आहे तुम्ही आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्या शिवाय पण मी लढायचं हे नक्की ठरवलं आहे, असे ठाकरे म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ता असताना लाभाची पद असताना ‘जिकडे मेवा तिकडे थवा’ असे ढिगाने सापडतील. पण या संकट काळात साथ द्यायला आपण उभे राहिले पाहिजे. आपला जीव लहान आहे आपल्या क्षमता किंवा आपल्याकडची संसाधन तुलनेने कमी असतील पण जो लढा सन्माननीय उद्धवसाहेब उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यात एक शिपाई म्हणून आपण असलं पाहिजे. एक खारीचा वाटा उचलला गेला पाहिजे. असं प्रकर्षाने वाटलं, असे अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची पडझड सुरु असताना आक्रमक बाण्याच्या सुषमा अंधारे यांच्या रुपाने पक्षाला एक उत्तम नेता मिळाला आहे.