शिवसेनेसोबत बंड करून सरकार स्थापन केलेले आमदार आज म्हणजेच रविवारी विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी विधिमंडळात पोहोचले होते. यावेळी या बंडखोर आमदारांची विधिमंडळात होणारी स्थिती शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितली असून, या आमदारांवर त्यांनी निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, बंड केलेल्या आमदारांची आज नैतिक परीक्षा झाली. ते सर्वजण खाली किंवा इकडे तिकडे बघत होते. ते माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हते. मतदार संघात गेल्यावर शिवसैनिकांना ते काय सांगणार आहे. त्यांच्यासमोर कसे जाणार, असा प्रश्न त्यांना पडला असेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच म्हणाले, शिवसेनेचे व्हिप शिंदे गटाने मान्य केले नाही. आमच्याविरोधात त्यांनी मतदान केले. आज ते पोलिसांच्या संरक्षणात आले. आले नाही तर आणले गेले. हे किती दिवस चालणार आहे. फुटलेल्या आमदारांची नैतिक चाचणी झाली पाहिजे.
बंड केलेल्या आमदारांकडे मी बघितले. त्यांची डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत झाली नाही. ते आपल्या मतदार संघात जातील तेव्हा शिवसैनिकांच्या डोळ्यात कसे बघतील, असा प्रश्न देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांची त्यांच्यावरची असणारी नाराजी देखील दिसत होती.
दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजून १६४ तर प्रस्तावाच्या विरोधात १०६ इतके मतदान झाले. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. मतदानासाठी शिवसेनेकडून आपल्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता.
मात्र हा व्हीप डावलून बंडखोर आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे शिवसेनेच्या प्रतोदकडून व्हीप मोडल्याप्रकरणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देण्यात आले. त्याची दखल झिरवळ यांच्याकडून घेण्यात आली.
मात्र त्यानंतर लगेचच बंडखोर आमदारांचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांनी आमचा व्हीप मोडत विरोधी पक्षाला मतदान केल्याचे म्हटले. या सगळ्या घडामोडीनंतर राहुल नार्वेकर हे १६४ मतांनी विजयी झाले. तर शिवसेनेचे राजन साळवी यांना केवळ १०६ मते पडली.