शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला. त्यांच्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय पेज निर्माण झाला आहे. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय नाट्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि कायदेतज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आता महत्वाचं भाष्य केलं आहे.
शिंदे यांनी शिवसेनेतील दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार फोडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल याची उत्कंठा वाढत चालली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत केलेल्या संवादात शिंदे यांच्या बंडावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी विधानं केली ती महत्वाची आहेत. एखाद्या आमदाराने येऊन सांगितलं, तर राजीनामा देऊन टाकेन. जे एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत, त्यांच्यापैकी. पण माझ्या मते आता त्यांच्यापैकी कोणी परत येऊ शकणार नाही.
तसेच म्हणाले, एकनाथ शिंदे असा दावा करत आहेत की, त्यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या दाव्याला कुणीही आव्हान दिलेलं नाही. आता किती दिवस एकनाथ शिंदे पुढे ढकलणार, हे महत्त्वाचं आहे. माझ्या मते राज्यपाल जोपर्यंत आयसोलेशनमध्ये आहेत, तोपर्यंत हे चालू शकतं. पण ते एकनाथ शिंदेंच्या फायद्याचं आहे का, तर अजिबात नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सद्यस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, शिवसेनेतील मुख्य गटातून एक गट वेगळा होऊ बघतोय, अशी स्थिती आहे आणि काहीही मिळणार नसेल तर मग ते परत शिवसेनेमध्ये जातील. त्यांना काहीही अडचण नाही. त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे एकनाथ शिंदे यांना राज्यपाल किंवा विधानसभा अध्यक्षांना पत्र द्यावं लागेल.
पुढे म्हणाले जर एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र दिलं, तर एकच होईल की, राज्यपाल उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगतील. समजा एकनाथ शिंदे यांनी हे पत्र, जर राज्यपालांना न देता आमच्या गटाला मान्यता द्यावी म्हणून विधानसभा उपाध्यक्षांना दिलं, तर कायद्याने उपाध्यक्षांना ज्यांनी सह्या केल्या आहेत, त्या सगळ्यांना बोलवावं लागेल आणि ही सही तुमची आहे का हे व्यक्तिशः बघून घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.