भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सचिन मस्के नावाच्या तरुणाला रस्त्याच्या मधोमध आडवा पाडत त्याचे तुकडे केले आहेत. भर रस्त्यात असे थरारक दृश्य पाहून आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
तुमसर शहरात काल सायंकाळच्या वेळी ही घटना घडली आहे. सचिन मस्के आरोपींच्या परिवारातील मुलगी घेऊन दोन दिवसांपूर्वी पसार झाला होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसात सचिन विरोधात तक्रार दिली होती. दरम्यान, दोन दिवसांनी सचिन मस्के घरी आला. मुलगी देखील तिच्या घरी गेली.
सचिनला मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, सचिन मुलीला फोन करून त्रास देत होता. या रागात आरोपींनी सचिनला मारण्याचा प्लॅन केला. मात्र, सचिनला या गोष्टीची चाहूल नव्हती. घटना घडली त्या दिवशीच्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे की, एका दुचाकीवर तीन जण बसून आले. मृतक सचिन हा गाडी चालवित आला.
सचिनच्या गाडीवर दुसरे दोन जण मागे बसले होते. एका दुकानासमोर दुसऱ्या आरोपीने गाडीतून धारदार सुरा काढला. तो सुरा दुपट्ट्यात गुंडाळून सचिनच्या दिशेने धावत सुटला. दुचाकीवरून दोघे जण खाली उतरले. सचिनवर धारदार सुऱ्याने वार करू लागले.
दुचाकीवरून तो खाली पडला. त्यानंतर एकाने शस्त्राने सचिनच्या मानेवर सपासर वार केले. दुसरे दोघे सचिन मेला की जीवंत आहे ते पाहत होते. त्यानंतर पुन्हा सचिनच्या मानेवर एक आरोपी वार करत होता. यावेळी रस्त्यावरची वाहतूक चालूच होती. सचिन जीवाच्या आकांताने फडफडत होता. आरोपी जीव जाईपर्यंत सुऱ्याने वार करत होता.
सचिनचा जीव गेला याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सचिनचा खून करणारे ते तिघे मुलीचे जवळचे नातेवाईक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेत आहेत.