Share

‘या’ अभिनेत्यामुळे सुरू झाला ‘चला हवा येऊ द्या’ शो; वाचा कसा तयार झाला पहिला एपिसोड

चला हवा येऊ द्या हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र चला हवा येऊ द्या हा शो नेमका कोणामुळे सुरू झाला याबद्दल कोणाला माहिती नसेल. तर याचा खुलासा शोचा सुत्रसंचालक आणि अभिनेता, लेखक निलेश साबळेने केला आहे.

३० जूनला निलेश साबळेचा वाढदिवस होता. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याचे आयुष्य पुढे नेणाऱ्या त्याचा शो ‘चला हवा येऊ द्या बद्दल’. २०१४ साली झी मराठी ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू झाला आणि मराठी टेलिव्हिजनवरील कॉमेडी रिअँलिटी कार्यक्रमांची व्याख्याच बदलली.

निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी या भन्नाट स्क्रीप्टच्या जोरावर पहिलाच एपिसोड गाजवला होता. पण तुम्हाला माहितेय का ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सुरुवात होण्याचं श्रेय कुणाला जातं? तर हे श्रेय जातं अभिनेता रितेश देशमुख याला.

निलेश साबळे याने याआधी देखील विविध मुलाखतींमध्ये हा किस्सा सांगितला आहे. मराठीतील डिजिटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या भाडिपाच्या ‘रेडी टू लीड’ कार्यक्रमात सारंग साठ्ये याने निलेशला असा प्रश्न विचारला होता की हा शो सुरू करताना काही डोक्यात निश्चित होतं का? शो चालू झाला तो नेमका कसा झाला?

यावर निलेश साबळे याने उत्तर दिले की,  ‘माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अपघाताने घडल्या. फू बाई फू पाच वर्ष त्यावेळी चाललं होतं. त्यावेळी रितेश देशमुखांचा ‘लई भारी’ हा सिनेमा आला होता. त्यावेळी रितेश यांनी झी कडे विचारणा केली होती की हिंदीप्रमाणे आपल्याकडे एक-दीड तास प्रमोशन करता येईल असा मोठा प्लॅटफॉर्म आहे का?

मात्र, असा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नव्हता. तेव्हा मला झी मधून फोन आला की त्यांची अशी इच्छा आहे की असा एक एपिसोड करायचा आहे. निलेशने कधी एपिसोड करायचा आहे असं विचारल्यावर चॅनेलकडून ‘परवा’ असे उत्तर आले. एक संपूर्ण शो जवळपास १६-१७ तासांत उभ करणं निलेशला सुरुवातीला कठीण वाटलं होतं.

पण चॅनेलने ‘लई भारी’ च्या प्रमोशनसाठी निलेशवर विश्वास दाखवला होता. अखेर, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी त्याने हा शो करण्याचे ठरवले. आता चला हवा येऊ दे मध्ये काम करणाऱ्या सर्वांना निलेशने फोन केला, पण तेव्हा त्यांच्या तारखा उपलब्ध नव्हत्या. केवळ भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा होकार निलेशला मिळाला होता.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now