सोलापूरमध्ये एका महिलेने पार्लरबाहेर एवढा गोंधळ घातला की परिसरात काही वेळासाठी खळबळजनक वातावरण निर्माण झालं. केसाला डाय करून देखील केस पांढरेच दिसतात या रागातून महिलेने ब्युटी पार्लर दुकान चालकाशी वाद घातला. एवढेच नाही तर त्याला चक्क चप्पलने मारहाण केली आणि पार्लरमधील काच फोडली आहे.
महिलेचे नाव वर्षा काळे असून, ती सोलापूर येथील आयकर भवन सोसायटी येथील रहिवासी आहे. तिने मोहम्मद साजिद सलमाने यांना मारहाण करून, पार्लरची काच फोडली यामुळे तिच्या विरोधात बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
सात रस्ता येथे डायमंड नावाचे हेअर सलुन व ब्युटी पार्लर आहे. या ठिकाणी १९ ऑगस्ट रोजी वर्षा काळे यांनी येऊन हेअर कट आणि हेअर डाय केले होते. डोक्यावर असलेली सर्व केस काळे केले होते. यासाठी ब्युटी पार्लरवाल्याने ५ हजार रुपये बिल आकारले होते.
काही दिवसानंतर महिलेने आरशात पाहिले असता काळ्या केसांमध्ये पांढरे केस निर्दशनास आले. त्यावरून चिडून ही महिला ५ सप्टेंबर रोजी ब्युटी पार्लरकडे आली आणि शिवीगाळ सुरू केली. एवढेच नाही तर ब्युटी पार्लर चालकाला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली.
स्वतःला वाचवण्यासाठी ब्युटी पार्लर चालक दुकानाबाहेर आला असता बाहेरील बाजूस वर्षा काळे या महिलेने चप्पल फेकून मारली. त्यानंतर तिथल्या इतर कामगारांना देखील चप्पलने मारहाण केली. महिलेने पार्लरसमोर मोठा गोंधळ घातला. महिलेचा रुद्रावतार पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली.
https://drive.google.com/file/d/1hreHdMs1jbHBOdAjafXMA8ZBv3hxMt97/view?usp=drivesdk
याबाबत ब्युटी पार्लर चालकाने सांगितले की, १९ ऑगस्टला या महिलेने व तिच्या मुलीने हेअर डाय आणि हेअर कट केले होते. त्याचे बिल ५ हजार झाले होते. पण काही दिवसानंतर ती महिला आली आणि पांढरे केस दाखवू लागली. आम्ही तिच्या डोक्यात पाहिले असता नैसर्गिकरित्या काही केस पांढरे उगवत होते.
नैसर्गिकरित्या डोक्यातून पुन्हा नव्याने येणाऱ्या केसांना पुन्हा एकदा काळे करावे लागेल असे सांगितले. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने चप्पलने मारहाण केली व दुकानातील काचा फोडल्या. त्यानंतर त्याने महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले.