राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे आता विजयाचा दुष्काळ संपल्याची भावना महाडिक आणि त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेची सहावी जागा जिंकत भाजपने तीन जागा आपल्या नावावर केल्या. भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय खेचून आणला. धनंजय महाडिक यांनी ४१.५६ मतं घेऊन शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. निकाल लागल्यानंतर धनंजय महाडिक यांनी आपल्या विजयाचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
विजयानंतर महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधला म्हणाले, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यामागे शिल्पकार जर कोण असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आहे. त्यांच्यामुळे विजय मिळाला आहे. त्यांच्या रणनीतीमुळे भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले.
म्हणाले, कोणतीही निवडणूक असली की टेन्शन हे सर्वच पक्षाच्या नेत्यांना असतं. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्या दोघांच्या रणनितीमुळे भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले, असे धनंजय महाडिक म्हणाले.
मला आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो, की माझा फक्त मुलगाच नाही, तर माझे सगळे भाऊ, माझी मुलं, माझी पत्नी, मित्र, मोठा परिवार, मुंबईत ठाण मांडून आहेत. महाडिक परिवाराचं बॉंडिंग अख्ख्या महाराष्ट्रानं यावेळी पाहिलं, विजयाचा दुष्काळ आता संपला, असेही महाडिक यावेळी म्हणाले.
म्हणाले, ज्या दिवशी अर्ज भरला, तेव्हाच सांगितलं होतं की भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील कारण फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं. त्यांनी ज्या पद्धतीनं माझं नाव घोषित केलं, जे गणित आखलं, जी रणनिती आखली, त्यामुळं आम्ही या निवडणुकीत यश संपादिक करु शकलो, याचा मला आनंद मिळतो.