Share

‘त्या’ दिवशीच्या प्रदीप भिडेंच्या निवेदनाने अख्खा महाराष्ट्र रडला होता; काय होता तो प्रसंग? वाचा..

प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं काल निधन झालं. त्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग लोकांना समजत होती. तो आवाज आता हरपला. ते ६५ वर्षांचे होते. शांत धीरगंभीर आवाज ही प्रदीप भिडे यांची खासियत होती.

प्रदीप भिडे यांचं बालपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या धामणी गावात गेलं. त्यांचं शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजमध्ये झालं. पुढे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी सुरूवातीला ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं.

त्यानंतर १९७४ साली दूरदर्शनवर त्यांची सुरुवात ‘प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक’ म्हणून झाली. त्यावेळी त्यांचा आवाज ऐकून, मुंबई दूरदर्शन केंद्राचे तेव्हाचे संचालक शास्त्री यांनी बातम्या का वाचत नाही? अशी विचारणा केली, आणि त्यानंतर भिडे यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

त्यांनी संधीचं सोनं केलं आणि दूरदर्शनच्या वृत्तनिवेदक पदासाठी रीतसर ऑडिशन दिली. या पदासाठी त्यांची निवड झाली. त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं. निवेदनात आत्मविश्वास होता. सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी सातच्या बातम्यांच्या निवेदनाच्या वेळी ‘आजच्या ठळक बातम्या’ हा त्यांचा आवाज ऐकण्याची लोकांची देखील सवय झाली होती.

भारताचे माजी पंतप्रधान ‘राजीव गांधी यांची हत्त्या झाली, त्यावेळी दूरदर्शनच्या केंद्रावर बातमी देण्यासाठी कोणीही नव्हतं. मग वृत्त संपादिका विजया जोशी यांनी भिडे यांना असशील तसा त्वरीत निघून ये म्हणून सांगितलं. त्यावेळी भिडे यांनी वृत्तनिवेदन केलं. राजीव गांधींच्या बातम्या ऐकताना भिडेंच्या आवाजाला एक कारुण्याची झालर होती, हे कोणीही विसरू शकत नाही.

राजीव गांधी यांच्या हत्येच्या बातम्या भिडे यांनी दिल्या त्यावेळी त्या बातम्या अनेकांच्या काळजाला भिडल्या. बातम्या ऐकून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेकांचे डोळे पाणावले. ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया त्यावेळी त्यांच्या आवाजावर लोकांनी दिल्या.

त्यानंतर, १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोटांची मोठी मालिका झाली होती, त्यावेळी देखील वृत्तनिवेदनाचे काम भिडे यांनी केलं होतं. त्यांनी बातमी परिणामकारक रित्या सादर केली. आजही त्यांनी केलेलं वृत्तनिवेदन अनेकांना आठवत राहतं. याच प्रदीप भिडे यांचं काल निधन झालं. निधनानंतर माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now