Share

कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघेही ऊस तोडणी मजुरांची मुलं होती. एकाच घरातील तीन भावंडांच्या मृत्युमुळे आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

ही घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे घडली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेली घटना रात्री आठ वाजता आईवडील कामावरून घरी आल्यानंतर उघडकीस आली. मृत झालेल्या मुलांची नावं रेणुका अंकुश जाधव जी 17 वर्षांची होती. चुलत भाऊ अजय बाळू जाधव हा पाच वर्षांचा आणि सुरेखा गायकवाड अशी आहेत.

गायकवाड आणि जाधव कुटूंबातील सदस्य ऊस तोडणीसाठी आले होते. आष्टी येथील व्यवहारे वस्तीवर लोकनेते बाबुराव पाटील अनगरकर अँग्रो इंडस्ट्रीज साखर कारखान्याच्या ऊस तोडणीचे काम सुरू होते. नेहमीप्रमाणे ते आपली मुलं घरीच ठेवून गेले होते.

रात्री आठ वाजता कामावरून घरी आल्यानंतर घरात मुलं दिसली नाही. आसपास चौकशी केली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, ओढ्यावर त्या मुलांच्या चपला आणि धुण्याची बादली पाहून काही तरी अनर्थ घडला असावा, असा अंदाज त्यांना आला.

पाण्यात शोध घेतला असता रात्री दोन्ही मुलींचे मृतदेह मिळाले तर मुलाचा शनिवारी सकाळी 10 वाजता मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली. या प्रकरणी मोहोळ पोलिसांत अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

सध्या ऊस तोड मजुरांचे आणि कुटूंबाचे हाल सगळीकडे होताना दिसतात. त्यांच्यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. ऊस तोडी करणाऱ्या लोकांचे सतत स्थलांतर होत असल्याने मुलांना शाळेसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात.

इतर

Join WhatsApp

Join Now