Sanjay Raut : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर (Mira Bhayandar) शहरात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना अटक केल्यानंतर विरोधकांनी भाजप (BJP) आणि शासनावर जोरदार टीका सुरू केली आहे. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्यावर संतप्त शब्दांत टीका केली आहे.
“हे महाराष्ट्र राज्य आहे की दिल्लीचं बाहुपट्ट्याचं मैदान?”
संजय राऊत म्हणाले की, मोर्चासाठी आधी परवानगी दिली जाते, मग ती मागे घेतली जाते आणि नंतर सकाळी तीन वाजता पोलिस कारवाई करतात. त्यांनी हे विचारले की, हे महाराष्ट्र आहे की बाहेरील राज्य? आणि असा पोलिसी अतिरेक नेमका कुणाच्या सांगण्यावरून केला जातो आहे?
“मुख्यमंत्री नेभळट, डेप्युटी सीएम अर्धा दाढीवाला”
राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी असल्याचे सांगतात पण त्यांचं वागणं हे मोरारजी देसाईंप्रमाणे आहे. त्यांनी आरोप केला की, मराठी लोकांवर अन्याय करणं आणि अमराठी प्रवृत्तींना पाठिंबा देणं हे सत्ताधाऱ्यांचं धोरण बनलं आहे. “राज्यातला मुख्यमंत्री नेभळट आहे, आणि उपमुख्यमंत्री अर्धा दाढीवाला आहे. त्यांना शिवसेनेचं नाव घेण्यास लाज वाटते,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
“निशिकांत दुबे म्हणजे उद्योगपतींचा दलाल”
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, संजय राऊत यांनी दुबे यांना “दलाल” असे संबोधले. ते म्हणाले की, “दुबे यांचं काम उद्योगपतींची दलाली करणं आणि कमिशन घेणं आहे. अशा व्यक्तीने महाराष्ट्रावर बोलावं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.”
राऊत यांनी असा आरोप केला की, केंद्र सरकारने कोरोना काळात जबाबदारी झटकली होती आणि महाराष्ट्राने, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने, सर्वसामान्य जनतेला मदत केली. ते म्हणाले, “गंगेत प्रेतं वाहत होती आणि महाराष्ट्र मात्र देशाला अन्न आणि औषधं पुरवत होता.”
शेवटी, राऊत यांनी स्पष्ट केलं की मराठी अस्मिता, हक्क आणि अधिकारांसाठी लढा थांबवला जाणार नाही. त्यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकेची झोड उठवत सांगितले की, मराठी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.