मुलगा मुख्यमंत्र्यांना पाडून झाला आमदार, तरीही सफाई कामगार आई पोहोचली कामावर; म्हणाली..

नुकताच पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, पाचपैंकी चार राज्यात भाजप विजयी झाली आहे, तर एका राज्यात आम आदमी पक्षाने आपली सत्ता घेतली. पंजाब मध्ये आम आदमी पक्ष निवडून आल्याने हा एक ऐतिहासिक विजय मानला जात आहे. भदौर मतदारसंघातून भाजपचा पराभव करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वच चकीत झाले आहेत. याठिकाणी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि पंजाबचे मावळते मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनाही पराभवचा सामना करावा लागला आहे. या सगळ्या मोठ्या पक्षांना टक्कर देत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

पंजाब मधील भदौर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभसिंग उगोके यांनी मोठ्या फरकानं काँग्रेस आणि भाजपचा पराभव केला आहे. चरणजीतसिंग चन्नी यांचा तब्बल 37 हजार 550 मतांनी पराभव केला आहे. भदौर मतदारसंघातील हे लाभसिंग मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करतात. त्यांची आई सरकारी शाळेत सफाई कामगार आहे, तर वडील मजूर आहेत.

नुकताच निकाल लागला आणि आपला मुलगा आमदार झाला याचा त्यांना आनंद झाला, मात्र त्यांनी त्या गोष्टीचा बडेजाव केला नाही. लाभसिंग यांच्या हातात पूर्ण मतदारसंघ आला असून देखील त्यांची आई शाळेत आपल्या सफाई कामगाराच्या ड्युटीवर हजर झाल्या. त्यांना हे काम पुढे असेच सुरु ठेवायचे आहे.

लाभसिंग यांच्या आईचे नाव बलदेव कौर आहे. त्यांचे सामान्य कुटुंब आहे. आई वडील कष्ट करून कुटूंब चालवतात. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या मुलाला शिकवले आहे. आज त्यांचा मुलगा आमदार झाला याचा त्यांना अतिशय आनंद झाला.

बलदेव कौर यांनी सांगितले की, लाभसिंगचा सामना हा मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याशी होता. तरीसुद्धा त्याला पहिल्या दिवसापासून निवडणूक जिंकण्याची खात्री होती. माझा मुलगा आमदार झाला असला तरी तो यापुढेही आपले कर्तव्य बजावणार असल्याचे त्यांच्या आईने सांगितले.

तसेच म्हणाल्या, लोकांना माझ्या मुलाकडून खूप आशा आहेत. तो देखील यापुढे लोकांच्या आरोग्य, शिक्षणासाठी आणि आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपले कर्तव्य पार पाडेल. मी माझे सफाई काम यापुढे देखील चालूच ठेवणार, असे त्यांनी सांगितले.