महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती केली. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झालं.
सध्या शिवसेनेच्या अनेक आमदारांसोबत खासदार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यातच काल शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना देखील ईडीने अटक केली. त्यामुळे शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्का मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.
राज्यातील शिवसेनेची अशी स्थिती पाहता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मोठं विधान केलं आहे. देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याची क्षमता राहिली नाही. आता देशात बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि फक्त भाजपच राहील. असं नड्डा म्हणाले.
जे पी नड्डा पाटणा येथे एका जाहीर सभेत बोलत होते. म्हणाले, आता कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातही शिवसेना संपत चालली आहे. आता महाराष्ट्रात फक्त कमळ फुलणार, असे नड्डा म्हणाले.
तसेच म्हणाले, भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेला पक्ष आहे. भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे. आता एका देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. आम्ही कार्यालय बोलतो, ऑफिस नाही, कार्यालय हे संस्कृतीचे केंद्र आहे. कार्यालय हे संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. कार्यालयात येऊन लोक संस्कार शिकतात.
दरम्यान, जे.पी. नड्डा यांनी पाटणा येथूनच राज्यातील १६ जिल्ह्यांतील भाजप कार्यालयांचे उद्घाटन केले. म्हणाले, अनेक राज्यांतून काँग्रेस आता संपत चालली आहे. भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. इथून करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. बिहार ही लोकशाहीची भूमी आहे. येथे केवळ भाजपच कुटुंबवादाच्या विरोधात लढू शकते.