एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह भाजपसोबत युती केली, आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन भाग पडले. आता शिवसेना नेमकी कोणाची यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
राज्यात शिवसेनेनी अशी स्थिती असताना, आता शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. दादरमध्ये नवीन शिवसेना भवनाच्या घोषणेनंतर शनिवारी मानखुर्द येथे शिंदे गटाच्या नवीन शाखेचे उदघाटन करण्यात आले. हे उदघाटन शनिवारी शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई आणि महाराष्ट्रातील शिंदे गटाची ही फिलिबशाखा असल्याचं म्हटलं जात आहे. या शाखेला शिवसेना शाखा १४३ असे नाव देण्यात आलं आहे. या शाखेच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर मध्ये एकीकडे स्टेशन लगत शिवसेनेची १४३ वि शाखा आहे. महाराष्ट्रनगर मध्ये ही पहिली शाखा उभी राहिली आहे. काल शिंदे गटाचे आमदार सदा सर्वणकर यांनी दादरमध्ये शिंदे गटाचे सेना भवन आणि विविध ठिकाणी शाखा उभ्या करण्याचे वक्तव्य केले होते.
दरम्यान, शिंदे गटातील औरंगाबादेतील आमदार संजय शिरसाट यांच्या ट्विटनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. म्हणाले, मी भावनेच्या भरात बोलून गेलो. पण स्पष्ट सांगतो की, हा सर्व माझ्या मोबाईलचा झालेला टेक्निकल प्राॅब्लेम आहे. मागची पोस्ट कशी पुन्हा फाॅरवर्ड झाली हे मला आता सांगता येणार नाही.
शिरसाट यांनी डिलीट केलेल्या पोस्टवर अनेकांनी नवीन पोस्ट शेअर करुन त्यांना डिवचलं आहे. राष्ट्रवादीचे नेते, प्रवक्ते महेश तपासे यांनी शिरसाटांना टोला लगावला आहे. म्हणाले, आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्वीट हे तांत्रिक चुकीमुळे नव्हते तर तो त्यांचा अंतरआत्म्याचा आवाज होता, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.