काल पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. निकालानंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या, आमदारांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यातच, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे तीन उमेदवार निवडून आले. कालच्या या निकालावर आमदार संतोष दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संतोष दानवे यांनी माध्यमांशी बोलताना, अब्दुल सत्तार यांनी राज्यसभेला आम्हाला फार मदत केली असे वक्तव्य केलं आहे.
संतोष दानवे यांचे अब्दुल सत्तार यांच्याविषयीचे विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. दानवे म्हणाले, अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले.
त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही करावी असे संतोष दानवे म्हणाले आहेत. आता भाजपच्या एका आमदाराने शिवसेनेच्या बड्या नेत्याने आम्हाला मदत केली म्हटल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून, यावर चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, नवनिर्वाचीत खासदारांच्या सत्कार समारंभात बोलताना फडणवीस म्हणाले, पराभव झाल्यामुळे बावचळलेत, पिसाटलेट काहींची तोंडं पडली आहेत. मुख्यमंत्र्यांनी अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. विधान परिषदेतही अशाच प्रकारे विजय मिळवू.
तसेच म्हणाले, अपक्ष आमदारांना ते काहीच करु शकत नाहीत कारण त्यांना सरकार टिकवायचं आहे. जर ते अपक्ष आमदारांना काही बोलले तर ते सरकारमधून बाहेर पडतीलच परंतु आमच्यावर प्रेम करणारे लोकही सरकारमधून बाहेर पडतील, असे म्हणत विरोधकांना टोला दिला.